Apr 23, 2012

Hind Kesari

eSakal
कोल्हापूर - हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेतील महाराष्ट्रातल्या चारही मल्लांचे आव्हान आज संपुष्टात आले. महाराष्ट्र केसरी विजय बनकर, जळगावचा विजय चौधरी, कोल्हापूरचा नंदू आबदार व संग्राम पाटील यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. मध्य प्रदेशचा रोहित पटेल, एनसीआरचा नरेंद्र, सेनादलाचा युद्धवीर व एनसीआरचा हितेशकुमार यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

प्रतिष्ठेची हिंदकेसरी स्पर्धा यंदा कोल्हापुरात होत असताना, महाराष्ट्रातील तगडे मल्ल यात सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात विजय बनकर, विजय चौधरी, नंदू आबदार व संग्राम पाटील या मल्लांवर राज्य कुस्तीगीर परिषदेची भिस्त राहिली होती. निवड चाचणीकडे अन्य मल्लांनी पाठ फिरवली असताना, या चौघांनी मात्र हिंदकेसरी स्पर्धेतून पळ न काढता किमान सहभागी होण्याचे तरी धाडस दाखविले. त्यांच्या विरोधातील मल्ल सरस असल्याने आज एकाही महाराष्ट्रीय मल्लाला उपांत्य फेरी गाठता आली नाही. पहिल्या लढतीत मध्य प्रदेशच्या रोहित पटेलला नंदू आबदारने काट्याची लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनुभवी रोहितने चौथ्या मिनिटाला त्याला एकेरी पट काढून चितपट केले. नंदूने दोन वेळा आक्रमक पवित्रा घेत रोहितला खाली खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून रोहितने सहीसलामत सुटका करून घेतली. पहिली लढत चटकदार झाल्याने, जळगावचा विजय चौधरी, तर सेनादलाचा युद्धवीर याच्याकडे कुस्तीशौकिनांचे लक्ष लागून राहिले होते. विजयनेही शौकिनांची निराशा न करता, युद्धवीरवर आक्रमक डाव टाकण्याचा प्रयत्न केला. एक वेळ युद्धवीर सहा, तर विजय चार गुणांवर होता. शेवटच्या पाच मिनिटांत घामाच्या धाराने भिजलेल्या विजयची चांगलीच दमछाक झाली. अंगी बळ असूनही दम लागल्याने विजय हतबल ठरला. अखेर युद्धवीरने 8 विरुद्ध 4 गुणाने बाजी मारली.

महाराष्ट्रकेसरी विजय बनकर याच्याकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. विजयने आक्रमक होऊन हितेशवर आक्रमक डाव टाकले. दोघांचे गुण तीन-तीन झाल्याने ही लढत अतिशय रंगतदार अवस्थेत होती. अखेर हितेशने अनुभव पणास लावून शेवटच्या पाच मिनिटांत विजयवर 8 विरुद्ध 3 गुणाने विजय मिळविला. संग्रामला एनसीआरच्या नरेंद्रने अवघ्या दोन मिनिटे चाळीस सेकंदांत चितपट केले.

No comments:

Post a Comment