Oct 26, 2013

महाराष्ट्राचे नवे आशास्थान

लहानपणापासून कुस्तीची आवड आणि घरच्यांचाही पाठिंबा. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावत असताना अचानक हाताच्या दुखापतीने उचल खाल्ली. हातावरील उपचार आणि शस्त्रक्रियेत तीन वर्षे गेली तरी त्याची जिद्द कायम होती. ‘हिंद केसरी’ किताबावर नाव कोरलेला पुण्याचा मल्ल अमोल बराटेची ही कथा. अफाट जिद्दीच्या बळावर त्याने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले. अमोलमुळे महाराष्ट्राच्या मल्लाला तब्बल आठ वर्षानी ‘हिंद केसरी’ स्पर्धा जिंकता आली. ‘मॅट’वर खेळल्या गेलेल्या हिंद केसरी कुस्तीच्या जेतेपदाचा पहिला मानकरी अमोलच ठरला. सध्या कुस्तीप्रेमींसाठी दिवसेंदिवस आनंदाच्या बातम्या येत आहेत. २०२० ऑलिंपिकसाठी कुस्तीचा समावेश कायम राहिल्यामुळे कुस्तीप्रेमी उत्साहात आहेत. त्यात गेल्या महिन्यात भारताच्या दोन कुस्तीपटूंनी जागतिक कुस्ती स्पध्रेत दोन पदके जिंकली. त्यामुळे भारताचा पुरुष संघाचा पुढील वर्षी होणा-या कुस्ती वर्ल्डकपमध्ये फ्रीस्टाइल संघात प्रथमच प्रवेश झाला आहे. या स्पध्रेत ग्रीको-रोमन प्रकारात मुंबईच्या संदीप यादवने ऐतिहासिक कांस्यपदक मिळवले. या सर्व घडामोडींमध्ये महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींसाठी मंगळवारी आणखी एक आनंदाची बातमी आली. पुण्याचा अमोल बराटे हा मानाच्या हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरला. अमोलची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. हाताला झालेल्या दुखापतीमुळे तो तीन वष्रे कुस्तीपासून दूर होता. त्याचा हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच हाताची समस्या इतकी गंभीर होती की, तो पुन्हा कुस्ती खेळेल किंवा नाही, याबाबत साशंकता होती. मात्र त्यातूनही जिद्दीने सावरत अमोल हिंद केसरीसाठी सज्ज झाला. त्यातच आंतरराष्ट्रीय निकषांनुसार, हिंद केसरी प्रथमच मॅटवर खेळली गेल्याने अमोलसमोर मोठे आव्हानच होते. मात्र पहिल्या फेरीपासून त्याने खेळ उंचावत आणि सातत्य राखत आव्हान यशस्वीपणे पार केले. आता पुढील वर्षी होणारी राष्ट्रकुल स्पर्धा आणि त्यानंतरच्या रिओ ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न त्याने बाळगले आहे. हाताच्या गंभीर दुखापतीतून सावरलो, याचा अभिमान वाटतो, असे अमोलने सांगितले. ‘हिंद केसरी’ला गवसणी घातली तरी ‘महाराष्ट्र केसरी’ ही आणखी एक मानाची स्पर्धा त्याला जिंकता आली नसली तरी त्या स्पर्धेतील ९६ किलो गटात सलग दोन वेळा त्याने सुवर्ण कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो राज्यातील पहिला मल्ल आहे. कुस्तीला हरयाणा, दिल्ली राज्यांमध्ये प्रोत्साहन दिले जाते. महाराष्ट्रात तितके प्रोत्साहन मिळत नाही, अशी ओरड होते. मात्र खाशाबा जाधवांचा वारसा चालवून भारताला ऑलिंपिकमध्ये घेऊन जाणारे मल्ल महाराष्ट्रात उदयास येत आहेत, हे बरातेचे यश पाहिल्यावर दिसून येते. ‘हिंद केसरी’ पटकावणारे मल्ल आमच्याकडेही आहेत, हे अमोलने दाखवून दिले. संदीप यादवसह अमोल बराटे, अमोल बुचडे आदी युवा मल्लामुंळे महाराष्ट्राच्या कुस्तीला चांगले भविष्य आहे, हे नक्की.

http://prahaar.in/shadow/hotfaces/146407

No comments:

Post a Comment